ना गरी सह कारी पत संस्था

अध्यक्षांचे मनोगत

नमस्कार, मी

श्री. नंदकुमार म. चाळके

अध्यक्ष (Kamal Nagari Sahakari Patsanstha Marya., Alibag)

सभासदांचा विश्वास हेच आमचे सर्वात मोठे भांडवल आहे. आर्थिक प्रगतीसोबतच सामाजिक बांधिलकी जपत प्रत्येक सभासदाच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

कमळ नागरी सहकारी पतसंस्था ही केवळ आर्थिक संस्था नसून हजारो सभासदांच्या विश्वासाची परंपरा आहे. पारदर्शक व्यवहार, आधुनिक सेवा सुविधा आणि सभासदाभिमुख दृष्टिकोन यांच्या बळावर संस्थेची प्रगती सातत्याने होत आहे.

सभासदांचा विश्वास
पारदर्शक व्यवहार
आधुनिक सेवा सुविधा
सभासदाभिमुख दृष्टिकोन

अध्यक्षांचे संपूर्ण मनोगत

श्री. नंदकुमार म. चाळके, अध्यक्ष — कमळ नागरी सहकारी पतसंस्था मर्या., अलिबाग

सन्माननीय सभासद बंधू-भगिनींनो,

दि. ४ एप्रिल १९९२ कमळचा स्थापना दिन, ज्या दिवशी सहकारदृष्ट्या 'मागास' भागात एक आर्थिक संस्थेचे रोपटे लावले गेले. आज कमळचा एक डेरेदार वृक्ष झाला आहे. कमळची सर्वांगीण वाढ झालीच आहे पण कमळच्या छायेखाली ज्या संस्था सुरु झाल्या त्यांचीही पाळेमुळे खोलवर रुजण्यास सुरुवात झाली आहे. कमळचे उपक्रम नित्यनेमाने चालवित असताना २०१७ पासून दरवर्षी महाशिवरात्री निमित्त होत असलेला भजनांचा अखंड जागर, भक्तगणांना प्रसाद म्हणून साबुदाणा खिचडी वाटप, रामनवमीला रामभक्तांना थंड पेयाचे वाटप, दरवर्षी ११ नोव्हेंबरला साजरा केला जाणारा ग्राहक दिन हेही नैमित्तिक उपक्रम चालूच असतात.

यंदाचे २०२५-२६ हे एक ऐतिहासिक विक्रमी व्यवसायाचे वर्ष म्हणावे लागेल. यंदा आपण रु. १०००/- कोटी रुपयांचा मिश्र व्यवसायाचा टप्पा पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने ओलांडला. या आर्थिक वर्षात तर विक्रमी अर्थव्यवहार करीत एकूण रु. २४५ कोटींचा मिश्र व्यवसायाचा टप्पा आपण पार पाडला. यंदाच्या वर्षात आपण अलिबाग शहराच्या मध्यवस्तीत सुमारे ९ गुंठे जागा खरेदी केली असून त्यामध्ये आपले मध्यवर्ती कार्यालय, सुसज्ज शाखा व अनुषंगिक गोष्टींचा अंतर्भाव असणार आहे. पुढील ३ वर्षात हे सर्वकाही उभारले जाईल अशी आपली अपेक्षा आहे. आणि हे सर्व करीत असताना संस्थेच्या व्यवस्थापनाने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी सुधारित वेतनश्रेणीची रचनाही मान्य करून एक आकर्षक पॅकेज यंदा आपण देऊ केले आहे. वरील सर्व उपक्रम आपली सामाजिक बांधिलकीशी असलेली घट्ट नाळ दर्शवित असतानाच रु. १००० कोटींच्या एकत्रित व्यवसायाबरोबरच जिल्ह्यातील सुधागड पाली तालुक्यातील पाच्छापूर शाळा, अलिबाग येथील वात्सल्य ट्रस्ट, विठ्ठल मंदिर अलिबाग, महाड येथील काकासाहेब चितळे रक्तपेढी, चिंचवली-हाशिवरे या अलिबाग तालुक्यातील प्राथमिक शाळेस केलेले भरीव आर्थिक सहाय्य, वनवासी कल्याण आश्रमासाठी उपलब्ध केलेले अर्थसहाय्य हे दायित्व समाजाच्या विविध वर्गातून अभिनंदनीय व अनुकरणीय ठरले आहे.

✣ कमळचा ३३ वर्षांचा उत्तुंग प्रवास ✣

दि. १० मार्च २०२६ रोजी कमळ पतसंस्थेने रु. १००० कोटींचा एकत्रित व्यवसायाचा टप्पा ओलांडला आणि अनेकांकडून व्यक्तिशः अध्यक्ष म्हणून माझे व पर्यायाने कमळचे अभिनंदन केले गेले. या रु. १००० कोटींच्या व्यवसायाचे सिंहावलोकन करताना सहजच या आकडेवारीचा मागोवा घेतला तेव्हा असे लक्षात आले की जसे प्रवासात असताना एकेक थांबा आपण पार करत असतो त्यातलाच हा एक टप्पा होता. कमळचा स्वच्छ व पारदर्शक कारभार, आकड्यांच्या हव्यासाचा अभाव, सामाजिक बांधिलकीची सातत्याने जाण आणि आचरणाशी सुसंगत असा संचालक मंडळाचा कारभार व त्यांना त्याच तोलामोलाची साथ देणारा कर्मचारी वृंद ही या टप्प्यातील विशेषता!

✣ कमळला आकड्यांचा सोस नाही ✣

हा रु. १००० कोटींचा आकडासुद्धा कमळने ठरवून पार पाडलेला नाही. या प्रगतीमधील बारकावे शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा आपण संख्यात्मक प्रगतीपेक्षा गुणात्मक प्रगतीकडे दिलेले लक्ष हेच याचे मुख्य गमक असल्याचे जाणवते. छोटे ठेवीदार व छोटे कर्जदार यांच्यामुळे कदाचित हजार कोटींचा आकडा गाठण्यात आपण मागे असलो तरी लाभार्थ्यांची संख्या परिणामकारकरित्या वाढवण्यात यशस्वी ठरलो. हे करताना कमळची सर्वाधिक यशस्वी ठरलेली महिला बचत गट योजना, अत्यल्प उलाढाल असणाऱ्या गरजू महिलांसाठी कमी व्याजदराने राबविली जाणारी गृहस्वामिनी योजना, सामाजिक बांधिलकीचे दायित्व जपून अंमलात आणलेली शैक्षणिक कर्ज योजना कमळला एका वेगळ्या उंचीवर नेण्यास सहाय्यभूत ठरल्या. उपरोक्त योजना रकमांच्या आकडेवारीत किरकोळ असल्या तरी हजारो लोकांची गरज भागवून राष्ट्र विकासात हातभार लावण्यास कारणीभूत ठरल्या.

✣ महिला बचत गट — अनोखा उपक्रम ✣

महिला बचत गटाच्या माध्यमातून आपण टेलरिंग, घरगुती खानावळ, सुक्या मच्छीचा किरकोळ व्यवसाय, भाजीविक्री, फळ विक्री यासारख्या 'ॲक्टिव्हिटीबेस्ड फायनान्स' पासून उपभोगजन्य कारणांसाठी कर्ज पुरवठा केला. एका महिलेला किमान रु. १०,००० पासून कमाल रु. १ लाखापर्यंत आपण कर्ज देऊ केले. आजपर्यंत आपण सुमारे १०,८०० एवढ्या महिलांना त्यांनी स्थापन केलेल्या बचत गटाच्या माध्यमातून सुमारे ३९ कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा कर्जपुरवठा केला. १ कोटी रुपयांची ११ प्रकरणे करण्यापेक्षा १०,८०० जणांची ३९ कोटींची प्रकरणे करणे लौकिक अर्थाने त्रासदायक वाटत असले तरी ११ जणांच्या चेहऱ्यावरील समाधानापेक्षा या १०,८०० महिलांच्या चेहऱ्यावरील समाधान विलक्षण कर्तृत्वपूर्तीचा आनंद देणारे ठरले. परिणामी आपण आकडेवारीत कमी असलो तरी समाज उन्नतीसाठी केलेल्या कामामधून आपण गुणात्मक प्रगती करू शकलो ही विशेष बाब वाटते.

✣ प्राधान्याने ग्राहक हित ✣

या सर्व योजना आखताना ग्राहकाला कंफर्टेबल कसे वाटेल याचा आपण विचार करतो. विविध ठेव योजना ग्राहकांबद्दल सजगता बाळगून अंमलात आणतो. सर्वसाधारणपणे ठेवींचे व्याजदर हे कमी जास्त प्रमाणात सर्व वित्तीय संस्थांमध्ये सारखेच असतात. फरक असतो तो ग्राहक सेवेचा. कमळचे 'काऊंटरवरील चेहरे हाच कमळचा आरसा' आहे असे आम्ही मानतो. आणि त्याच अनुषंगाने विविध ठेव योजना तसेच त्यांचे व्याजदर आपुलकीने व आपलेपणाने सांगणे, प्रसंगी ग्राहकाच्या घरी जाऊन ग्राहकसेवा देणे ही 'कमळ' ने आपली बांधिलकी मानली आहे. आणि ही बांधिलकी ठेव रकमेवर अवलंबून नसते हे विशेष!

आजही मला दि. ०४ एप्रिल १९९२ रोजी रु. ३०,००० चे भागभांडवल, ३०,००० रुपयांच्या ठेवी व ३०,००० रुपयांचे कर्जवाटप व या सर्वांशी संबंधित व्यक्ती आठवतात. कमळने ग्राहकांची गरज ओळखून आपल्या ठेव योजना व कर्ज योजनांची आखणी केली आहे. सर्वसामान्यांसाठी मध्यम मुदत कर्ज, नजरगहाण कर्ज, सोनेतारण कर्ज, हमीपत्र कर्ज, वाहन तारण कर्ज, गृहकर्ज ही कर्जे जशी उपलब्ध करून दिली, तद्वतच व्यावसायिकांसाठी कॉटेज व्यवसाय कर्ज, मालतारण कर्ज, व्यवसाय कर्ज, मॉर्गेज कर्ज आपण उपलब्ध करून दिली. अलिकडच्या काळात सोलर ऊर्जा सिस्टीम कर्ज या उल्लेखनीय योजनेचा अनेकांनी लाभ घेतलेला आहे हे नमूद करावे लागेल. शिवाय या सर्वांमध्ये परवडणारे व्याजदर ही खास बाब म्हणता येईल.

✣ विविध सामाजिक उपक्रम ✣

ब्राह्मण आळीतील श्रीराम मंदिराच्या नजिक असलेल्या चिरायु अपार्टमेंटच्या १० X १० क्षेत्राच्या जागेत सुरु झालेली कमळ पतसंस्था मुख्य कार्यालयासह १६ शाखांच्या वटवृक्षाच्या सावलीत दिमाखदाररित्या रायगड जिल्ह्यात वावरते आहे. आजही अनेक स्वप्ने आहेत. त्यांना गवसणी घालण्याचे प्रयत्न चालू आहेत. संस्थेच्या माध्यमातून २०१७ साली ५ गीर गाईनिशी सुरु केलेली गोशाळा आज १०५ गीर जातींचा गोवंश बाळगून आहे. या गोशाळेचा आपण एक स्वतंत्र ट्रस्ट उभारला असून स्वमालकीच्या जागेत त्याचे कामकाज चालत असते. अलिबाग नजिक ८ कि.मी अंतरावर असलेल्या देऊळ भेरसे या गावी ही गोशाळा वसवलेली आहे. आपला आणखी एक उपक्रम म्हणजे श्री. सतीश वासुदेव धारप डायलेसीस सेंटर. कमळ सेवा संस्था या ट्रस्टच्या माध्यमातून अलिबागमध्ये या संस्थेची उभारणी केली आहे. याच बरोबर 'सहकार दर्शन' हे पूर्णपणे सहकाराला वाहिलेले पाक्षिक आपण 'कमळ' म्हणून प्रकाशित करीत असतो. या अंकाच्या ३००० हून अधिक प्रती सहकारी संस्थांमधून मोफत वितरित होत असतात व महाराष्ट्राच्या सर्व तालुक्यांपर्यंत पोचणारे पाक्षिक म्हणून याची नोंद आहे. या पाक्षिकामधून केवळ सहकारविषयकच साहित्य प्रकाशित केले जाते. हे सर्व करीत असताना या कामकाजाचा गाभा म्हणजे संघटन दुर्लक्षित चालणारच नाही. त्यादृष्टीने कोकणातील पाचही जिल्ह्यातील पतसंस्थांचे कोकण नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन आपल्या संस्थापक अध्यक्ष श्री. गिरीश तुळपुळे यांच्या अध्यक्षतेखाली नावारुपास आलेले आहे.

कमळने आज लौकिक अर्थाने रु. १००० कोटींचा एकत्रित व्यवसायाचा टप्पा ओलांडल्याने सर्वदूर कौतुक होत आहे. हे कौतुक स्वीकारताना कमळच्या प्रगतीतील स्थित्यंतरे नजरेसमोरून सरकतात आणि सुखदुःखाची व अभिमानाची गोष्ट म्हणजे दि. ०४ एप्रिल १९९२ सालापासूनच्या या प्रत्येक स्थित्यंतराचा मी साक्षीदार आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे आणि हे भाग्य मिळवून दिल्याबद्दल सर्व सभासद, हितचिंतक, व्यवस्थापक मंडळ यांचा मी ऋणी आहे.

✣ आभार ✣

रायगड जिल्हा उपनिबंधक, सह. संस्था, मा. तनवीर पाटील व त्यांचे कार्यालय, अलिबाग तालुका सहा. निबंधक मा. श्री. अनिल पवार तसेच महाड, रोहा, माणगांव, तळा, पेण, खालापूर, कर्जत, पनवेल येथील मा. तालुका सहा. निबंधक व त्यांचे कार्यालय यांचे सहकार्याबद्दल आभार.

संस्थेचे शासकीय लेखापरीक्षक श्री. राजन काळसेकर (चार्टर्ड अकाउंटंट) व त्यांचे सहकारी, संस्थेचे कर सल्लागार मा. मुकुंद वैशंपायन, मा. अतुल शेट्ये तसेच आमचे मित्र श्री. गणेशजी निमकर यांचे वेळोवेळी होत असलेल्या सहकार्याबद्दल आभार मानणे त्यांना आवडणार नसले तरीही आभार. त्याच बरोबर रायगड जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष मा. श्री. भाई जयंत पाटील, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मंदार वर्तक व त्यांची सर्व शाखा कार्यालये तसेच संस्थेच्या व्यवसायासंबंधित सर्व बँकांचे शाखाधिकारी व त्यांचे कर्मचारी यांचेही आभार. सर्वांत शेवटी संस्थेच्या दैनंदिन कारभारात आपुलकीने लक्ष घालणारे अनेक सभासद, ठेवी व कर्जामध्ये क्रियाशील सहभाग नोंदविणाऱ्या आपल्या सर्वांचेही आभार. त्याचबरोबर कमळच्या सर्व संचालक मंडळाचेही आभार.